रत्नागिरी : सोमवार दि. 02/03/ 2026 (फाल्गुन पौर्णिमा) रोजी रात्रौ 10 वा. सहाणेवरुन श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण म्हणून गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ मंडळी पारंपारिक पध्दतीत झाडगांव सहाणेवरुन महालक्ष्मी शेतातून श्रीदेव भैरी मंदिरात रात्रो 11 वाजेपर्यत गेले. मध्यरात्री 1 वाजता श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्वरी भेटीसाठी, ग्राम प्रदक्षिणा व जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी श्रीदेव भैरी मंदीरा बाहेर पडली व खालची आळी, कै. बाळोबा सावंत यांच्या आगरातून महालक्ष्मी शेतातून मध्यरात्रीनंतर साधारण 2.00 वाजेपर्यत श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात भेटीसाठी गेले .
मंगळवार दि. 03/03/ 2026 रोजी श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात मुरुगवाड़यातील मंडळी आल्यानंतर पहाटे 3 वाजता श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडून झाडगांव सहाणेवरुन झाडगांव नाका, टिळक आळी, कॉग्रेस भूवन, मुर्लीधर मंदीर, बंदर रोड मार्गे पहाटे मांडवी भडंग नाका येथे गेली . तेथून पुढे प्रत्येकी एक-एक तास याप्रमाणे मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चंवडे वठार, खडपे वठार मागील समुद्र मार्गाने जावून पुढे शेटये यांचे घराजवळ रस्त्यावर येवून खडपेवठारातून गोडीबाव तळ्यावर सकाळी आली. तेथून तेली आळी भागातून, राम नाका, राम मंदिर येथे दुपारी 3.30 वाजता आली. तेथून पुढे बारा वाडयांच्या वतीने राधाकृष्ण नाका, गोखले नाका येथे दुपारी 3.45 वाजता आली. तेथून पुढे गोखले नाक्यावरुन गाडी तळावरुन सहाणेजवळून, घसरवाटेवरुन मुरुगवाडयातील 20 नं शाळेच्या मागे श्री.शिवलकर यांच्या कंपाऊंडमध्ये होळीचा शेंडा घेण्यासाठी 4 वाजताच्या दरम्याने गेली. तेथून होळीचा शेंडा घेऊन सायंकाळी 6.00 वाजता झाडगाव येथे सहाणेवर आली असता सायंकाळी 7 वाजेपर्यंत ग्रहण असल्याने आई जोगेश्वरीच्या होळीचा शेंडा सायंकाळी 7.10 वाजता उभा करण्यात आला. त्याठिकाणी बारा वाड्यातील मानकरी व शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







