रत्नागिरी : नव वर्षाच्या स्वागतानिमित्त गुढीपाडवा हा दिवस महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो. तसाच या वर्षीही रत्नागिरीत उत्साहात साजरा करण्यात आला. रत्नागिरी शहरात गुढीपाडव्यानिमित्त शोभा यात्रेचे आयोजन केले जाते ते आजही करण्यात आले. या शोभा यात्रेत विविध चित्र रथ सहभागी झाले होते. या चित्ररथामध्ये सध्या सुरु असलेले आखाती युध्दाचे चित्ररथ सहभागी झाले होते. आखाती युध्दाच्या पार्श्वभूमीवर या शोभा यात्रेवर महागाईचे सावट पडेल असे वाटत होते परंतु रत्नागिरीकरांनी उत्साहपूर्ण वातावरणात गुढीपाडवा हा सण साजरा केला. रत्नागिरी शहरात विविध संघटनांनी आपले चित्ररथ सहभागी केले होते. ही शोभा यात्रा श्री देव भैरव मंदिरातून सुरु होवून शहरातील पतीत पावन मंदिरात तीची सांगता झाली. या शोभा यात्रेच्यावेळी ज्या ज्या भागात शोभा यात्रा जात होती त्यासाठी काही सामाजिक संघटनांनी पाण्याची, आईस्क्रीम व ताक अशा पेयांची व्यवस्था केली होती. त्यामुळे सामाजिक एकोपाचे दर्शन घडले.







