सिंधुदुर्ग: प्रतिनिधी
कोकणच्या विकासाच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला गेला असून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) ‘नाईट लँडिंग’ आणि ‘ऑल वेदर ऑपरेशन्स’साठी अधिकृत मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता सिंधुदुर्गात केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या वेळी आणि कोणत्याही ऋतूत विमाने उतरणे शक्य होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चिपी विमानतळावर रात्रीच्या विमान सेवेची प्रतीक्षा होती, जी आता पूर्ण झाली आहे.
तांत्रिक तपासणीनंतर डीजीसीएने या विमानतळाला आयएफआर (IFR) लायसन्स बहाल केले आहे, ज्यामुळे कमी दृश्यमानता आणि पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानातही उपकरणांच्या सहाय्याने सुरक्षित लँडिंग करता येईल. यामुळे आता विमान कंपन्यांना रात्रीच्या वेळीही आपली उड्डाणे शेड्यूल करता येतील आणि मुंबई, पुणे, बंगळुरू यांसारख्या शहरांतून येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचे अधिक पर्याय मिळतील. विमानतळाची क्षमता वाढवण्यासाठी तेथील पार्किंग स्टँडची संख्या देखील तीनवरून सहा करण्यात आली आहे.
विमानतळावर ‘सॅटेलाइट बेस्ड नेव्हिगेशन’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यामुळे वैमानिकांना ढगाळ हवामानातही अचूक मार्गदर्शन मिळेल. विशेष म्हणजे डिसेंबर २०२५ मध्ये चिपी विमानतळाने ११,००० प्रवाशांचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कोकणातील पर्यटनासाठी हा निर्णय अत्यंत कळीचा ठरणार असून रात्रीच्या विमानसेवेमुळे देश-विदेशातील पर्यटक थेट सिंधुदुर्गात उतरू शकतील, ज्याचा थेट फायदा स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि टॅक्सी चालकांना होईल. या सुविधेसाठी झालेल्या सातत्यपूर्ण राजकीय पाठपुराव्याला आता मोठे यश आले आहे.







