यंदा भारत आपला 77 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करत आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अमलात आले आणि भारत एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले. 2026 चा हा सोहळा केवळ लष्करी शक्तीचे प्रदर्शन नसून, आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा आणि प्रगतीचा गौरव आहे.
प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो की, या देशाचे खरे मालक आपण नागरिक आहोत आणि संविधानाने आपल्याला दिलेले हक्क आणि कर्तव्ये यांचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे.
हा देश वीरांचा आहे, बलिदानाची भली मोठी पार्श्वभूमी या देशाला आहे, मिळालेलं स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही. असंख्य क्रांतिवीरांनी ज्यावेळी आपल्या या देशाची भूमी स्वतःच्या रक्ताने शिंपली,त्यावेळी कूठे स्वातंत्र्याचं फुल फुललं,म्हणून प्रत्येकाला हे भान हवं की हा देश क्रांतिवीरांची अमानत आहे. इथली प्रजा म्हणजेच देशातील सर्व लोकं,मिळालेल्या स्वातंत्र्याचे भागीदार असल्याकारणाने प्रजासत्ताक दिन हा भारतीय जनतेचा सर्वात मोठा उत्सव आहे, आणि तो सर्व जनतेने आनंदाने साजरा केला पाहिजे.
राष्ट्रभक्ती,राष्ट्रप्रेम या भावनेची आताच्या लोकांत भीनली पाहिजे, यासाठी हा दिवस साजरा केला पाहिजे. क्रांतिवीरांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले,त्यामुळे जे काही वैभव स्वतंत्र भारताच्या नागरिकांना पाहायला मिळालं, त्याचा हा गौरव सोहळा आहे. लोकशाहीतील सर्वात मोठा असा जो उत्सव प्रजासत्ताक दिन प्रकाशमय होवून साजरा केला पाहिजे. यावर्षीचा प्रजासत्ताक दिन अशासाठी महत्वाचा आहे की, आपला शेजारी देश म्हणजेच आपल्यातून विभक्त झालेला पाकिस्तान आपल्यावर कायम कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतो, तसा त्याने आताही गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात दहशतवादी हल्ला केला, त्याला आपण चोख उत्तर दिले, आणि पाकिस्तानला नामोहरम केले. याचवेळी आपण 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपल्या सैनिकी सामर्थ्याची आपण जगाला नवीन ओळख करुन दिली. त्यामुळेच आपल्या देशावर वाईट नजर टाकणार्यांना यामुळे चपराक बसली आहे.
प्रजासत्ताक दिन हा केवळ सुट्टीचा दिवस नसून, आपल्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा दिवस आहे. संविधानाने दिलेल्या हक्कांसोबतच आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून देशाला महासत्ता बनवण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. हा दिवस सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा करणे आवश्यक आहे. या दिवसाचे महत्व पालकांनी आपल्या मुलांना सांगितले पाहिजे, जेेणेकरुन नव्या पिढीला हे कळले पाहिजे की, आपला भारत देश हा असाच आपल्याला मिळालेला नाही आहे. म्हणजेच यापूर्वी आपला देश इंग्रजांच्या गुलमगिरीत होता. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. परंतु आपल्या पुर्वजांनी आपल्या बलीदानातून हा देश स्वतंत्र केला. म्हणूनच आपण आता स्वतंत्र्यपणे जगू शकतो आणि या देशाला स्थीरता येण्यासाठी हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने तयार केले आहे. हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. एका ठिकाणी आपला देश आज जगातील महासत्ता बनत आहे. आपला देश हा जगातील आर्थिक महासत्तामध्ये चार क्रमांकाचा देश आहे. 77 व्या प्रजासत्ताक दिनी भारताने जगामध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळेच यावर्षी चला गाऊया जयघोष आपल्या महासत्ता होणार्या भारताचा! आणि हा प्राजसत्ताक दिन साजरा करुया उत्सव हा लोकशाहीचा, गौरव हा संविधानाचा.
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायु होवो !









