१३ फेब्रुवारी २०२६ ]
➡️भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज एका मोठ्या उलटफेरा’ची नोंद झाली. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे.
सामन्याची सुरुवात झाली ती ऑस्ट्रेलियाच्या नाणेफेक विजयाने. ऑस्ट्रेलियाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र झिम्बाब्वेच्या सलामीवीरांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. पहिल्या विकेटसाठी ७.३ षटकांत ६१ धावांची भक्कम भागीदारी करत त्यांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
सलामीवीर ब्रायन बेनेटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली.बेनेटच्या या खेळीमुळे आणि इतर फलंदाजांच्या फटकेबाजीमुळे झिम्बाब्वेने निर्धारित २० षटकांत २ गडी गमावून १६९ धावांचा डोंगर उभा केला.
१७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. झिम्बाब्वेच्या अचूक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज एकामागून एक तंबूत परतले.
सामन्यात ब्रॅड एव्हान्सने ट्रॅव्हिस हेडचा घेतलेला अफलातून झेल हा सामन्याचा मुख्य टर्निंग पॉईंट ठरला. या झेलमुळे ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला लगाम बसला.मॅट रेनशॉ आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना इतर फलंदाजांची साथ लाभली नाही.
झिम्बाब्वेच्या शिस्तबद्ध गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव मर्यादित धावसंख्येतच आटोपला. अखेर झिम्बाब्वेने हा सामना २३ धावांनी जिंकून विश्वचषकाच्या गुणतालिकेत मोठा चमत्कार घडवला आहे. कोलंबोच्या मैदानावर झिम्बाब्वेच्या चाहत्यांनी या ऐतिहासिक विजयाचा मोठा जल्लोष केला.







